|| झाले बहु, होतील बहु, आहेतहि बहु, परंतु या सम हा ||
राजगडाचं याहून सुंदर वर्णन होऊच नाही शकत. पूर्वेला पसरलेली नितांत सुंदर "सुवेळा", आपल्या पूर्वजांची स्थापत्यकला दाखवून आपल्याला तोंडात बोटं घालायला लावणारी "संजीवनी", आलेल्या सर्व सह्यगड्यांच आदरातिथ्य करणारी "पद्मावती" आणि या सर्वांच्या गराड्यात गडाच्या कणखरतेची साक्ष देत मध्यभागी उंच उभा असलेला बालेकिल्ला! बस बघतच राहावं !!
सुवेळाच्या नेढ्यात पहाटे पहाटे जाऊन बसलोय. सगळीकडे बऱ्यापैकी काळोखच आहे. पक्ष्यांची किलबिल त्या शांत वातावरणाला आल्हाददायक करून टाकतेय. पहाटेच्या थंडगार वाऱ्यांनी अंगावर सुखद शहारे आणलेत. पाठीशी बेलग बालेकिल्ला त्या सुर्यनारायणाला मुजरा करायला तयार झालाय. ते वाऱ्याचे झोत अंगावर घेत पूर्वेकडे बघायला लागतो. आकाशाच्या कॅनवासवर रंगांची उधळण करत, तांबडफुटी या नावाला सार्थ करत तो तेजाचा स्वामी दर्शन द्यायला लागतो. हात नकळत जोडले जातात. योगायोग म्हणून कि काय दूरवर महाराजांच्या नावानी घोषणा सुरु होतात. " ...... राजा शिवछत्रपती कि" .... " जय SSSSSSSS " म्हणताना उर अभिमानानी भरून येतो.
"उठ बे उठ ...... झोपतो काय !!!! सकाळ झाली !!!.... उशीर झाला !!!!! ..... उठ झोपू नको !!!! ..... चल... !!"
या शब्दांनी अमेयनी मला स्वप्नातून सत्यात आणलं. टेंटच्या बाहेर डोकावून बघितलं तर अजून काळोखच होता.
"किती वाजले ? " ... इति तन्मय .
"काय माहित ..... बघतो ! .... अरे ४ च वाजलेत " - अमेय
"मग एवढ्या लवकर काय करायचंय उठून .... झोप !!! " तन्मय
तिघंही पुन्हा झोपी गेलो. तोरण्यावरून सुरु केलेल्या यात्रेमधे आम्ही भागोजींच्या झापापाशी मुक्काम केला होता. रात्री उघड्यावर झोपण्याऐवजी आम्ही टेंट लावले (एवढं वजन उचलून आणलंय ते काय उगाच ? हा देखील एक हेतू ).
५.३० -६ च्या दरम्यान उठलो. तसंही अमेयनी कोंबडा आरवण्याची कर्णकर्कश्य अलार्म टोन लावली होती. त्यामुळे उठायला कष्ट पडले नाहीत (किंवा जास्तच कष्ट पडले ... अभी जैसी जिसकी सोच )
अमेय - तन्मयनी फक्कड चहा बनवला.
सगळ्यांनी आवरा-आवरी करायला सुरुवात केली. बऱ्याच कष्टानंतर ३-४ वेळा हाका मारल्यावर पिनाक साहेब टेंट मधून बाहेर आले. आणि शेवटी आम्ही टेंट उतरवायला घेतला. सगळ्यांनी नाष्टा करून घेतला. साधारण ६.३०-७ च्या सुमारास राजगडाकडे कूच केलं. मी , आदित्य, तन्मय आणि अमेय तेवढे मागे थांबलो. टेंट वगैरेची सगळी आवराआवर केली. कचरा जमा करून सगळं स्वच्छ केलं. अधिकचं सगळं समान, शिधा भागोजींना दिला आणि त्यांचा निरोप घेऊन आम्ही देखील राजगडाकडे निघालो.
बाकीचे आम्हाला दूरवर दिसत होते. बरेच पुढे पोचले असणार. काही वेळात माचीवर पोचतीलहि. " चला ! पटापट जाऊया !" - नेहमीप्रमाणे आदित्यचा सल्ला. रस्ता बऱ्यापैकी सरळ सरळ होता. चुकण्याचा काही प्रश्न नाही. २-३ टेकड्या पार केल्या. एक-दोन ग्रुप भेटले. तोरण्याकडे जात होते. त्यांना पुढच्या मार्गाची माहिती पुरवत-पुरवत मार्गक्रमण चालू होते. पाली- भुतोंडे रस्ता आडवा आला आणि राजगड खूपच जवळ आल्याचं लक्षात आलं.
पुन्हा काही हौशी लोकं भेटली. तोरण्याबद्दल विचारणा झाली. सगळे अगदीच नवखे दिसत होते. गिर्यारोहणाशी फारसा संबंध नसावा. फक्त महाराजांवर असलेल्या भक्तीने हे करायचं मनात आणलं असावं.
"अजून किती लांब म्हनलात तोरणा ? " - त्यातल्याच एकाने पुन्हा एकदा विचारणा केली
"५-६ तास तरी लागतील" - आदित्य
"बाब्बो .... एवढं आहे का अजून ? " ... अचंबा मिश्रित असहाय भाव.
"पाणी भरून घ्या फक्त मधे ... नंतर direct तोरण्याला पाणी लागेल" आम्ही सल्ला देऊन पुढे निघालो.
लोकांमध्ये असे ट्रेक करायची इच्छा होते हि चांगली गोष्ट आहे, पण त्यासाठी लागणारी पूर्वतयारी कुठेतरी कमी पडते. एकंदर गिर्यारोहण या बाबतीतच जागरूकता येणं, सुरक्षेबद्दल समज येणं खूप महत्वाचं आहे.
राजगडाचा शेवटचा चढ सुरु झाला. बाकी सर्वजण "संजीवनी" वर कधीच पोचले होते. चढ संपला आणि आम्ही संजीवनीच्या शेवटच्या बुरुजाच्या खाली येऊन पोचलो.
"महाराजांच्या काळात कसलं जबरी दिसत असेल ना हे !! ... सगळ्या बुरुजांवर भगवे फडकतायत, बाराबंदी- पगडी घालून मावळे बुरुजा-बुरुजांवर उभे आहेत. तोफा धडाडत आहेत, मराठ्यांचं घोडदळ 'जंग जीतन चलत' आहेत. " .... मी आणि तन्मय त्या भूतकाळातच रमलो होतो. एकदा इतिहासाचा विषय निघाला कि दुसरा कोणताही विषय लागत नाही. त्या गप्पांमध्ये अळू दरवाजा केव्हा ओलांडला तेच कळल नाही. त्या संजीवनी माचीच सौंदर्य डोळ्यात साठवत घटकाभर तिथेच विसावलो. संजीवनी माचीला दुहेरी तटबंदी आहे अर्थात आतल्या तटबंदीला बाहेरून दुसऱ्या तटानी सुरक्षित केलंय. बुरुज देखील चिलखती आहेत. स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना !!
![]() |
| सौजन्य : निलेश साळवी |
माची पार करून मुख्य रस्त्याला लागलो. बाजूलाच झाडाच्या सावलीत एक मामा ताक/ लिंबू सरबत घेऊन बसलेले. मस्त २-३ ग्लास भरून ताक - सरबत पिऊन झालं. "मामा, अजून किती ताक उरलंय तुमच्याकडे ? " - अमेयच्या डोक्यात काय आला कुणास ठाऊक ! "द्या मामा सगळं ताक " असं म्हणून बाटलीभर ताक घेतलं.
आता जास्त वेळ न घालवता पटापट सदरेपाशी पोहोचलो. बाकीचे सगळे आमची वाटच पाहत बसले होते.
"बालेकिल्ल्यावर कोण येणार ? " अमेयनी विचारलं. सगळ्यांनी राजगड या आधी केलेला असल्याने त्यांचा बालेकिल्ला आधीच पाहून झाला होता. अमेय, मानसी, शमांगी ताई आणि परिन बालेकिल्ल्याच्या दिशेने वळले. आणि आम्ही आमचा मोर्चा पद्मावती माचीकडे वळवला.
अपेक्षेप्रमाणे पद्मावती आईचं मंदिर "पर्यटकां"नी व्यापलं होतं. समोरच्या धर्मशाळेच्या ओसरीवरच आम्ही sack उतरवल्या. करायला काही काम नव्हतं - गप्पांना उधाण आलेलं. निमिषा, विराज, पिनाक, अश्विनी, तन्मय, आदित्य, भोपटकर काका, इंदापूरकर काका, गप्पांचा लई बेष्ट फड जमलेला. हळू हळू चकली, चिवडा, बिस्किटं असले खादीचे पदार्थ निघायला लागले.
राजगड पूर्णपणे गजबजलेला असतो आजकाल. पाली दरवाज्याचा रस्ता बराच सोप्पा केलाय. शिवाय गावकरी वरपर्यंत जेवणाची सोय करून देतात. त्यामुळे पर्यटक/ हौशी गिर्यारोहक/ "शिवभक्त" यांची गडावर शनिवार-रविवारी चांगलीच गर्दी असते. हृषीकेश यादव सरांनी मोठ्या कष्टानी स्वच्छ करवलेला पद्मावती तलाव, ठाण्याच्या तलावपाळीसारखा गर्दीच्या विळख्यात. आम्ही बसलेलो त्या ओसरीच्या एका कोपऱ्यात काही मुलं चूल वगैरे लाऊन maggi करत होते. mobile वर टिपिकल हळदीची गाणी मोठ्या आवाजात लावली होती. नंतर तन्मयनी थोडीशी "विचारपूस" केली आणि त्या मुलांनी आतली अक्खी एक खोली स्वच्छ करून दिली.
थोड्या वेळानी बालेकिल्ला टीम परत आली. मानसीने गुंजवण्यातून आधीच जेवणाची सोय केली होती. ते देखील पोहोचले. (तन्मय नी जेवणाला अक्षरशः "रस्त्यातच गाठले" म्हणा ना ). आतल्या खोलीत जेवणाची पंगत बसली. चवळी बटाटा रस्सा भाजी, मोठ्ठाली तांदुळाची भाकरी, झणझणीत मिरचीचा ठेचा, डाळ, भात ... काय मजा आली राव जेवताना ... दिल खुश कर दित्ता !!!!
थोडा वेळ विश्रांती घेऊन राजगड उतरायला सुरुवात झाली. मजल दरमजल करत संध्याकाळी ४-५ च्या सुमारास गुंजवण्यात पुरोहितांच्या हॉटेलात पोहोचलो..... पुरानी यादे ताजा हो गई!! .... पुढच्या वेळी कोणते ट्रेक करायचे याची "चाय पे चर्चा" झाली.
राजगड तोरणा ट्रेक पुन्हा एकदा पूर्ण झाला होता. पण प्रत्येक ट्रेक आपल्याला देतो त्या ट्रेकच्या आठवणी. आयुष्यभर लक्षात राहतील अश्या. शेवटपर्यंत थांगपत्ता लागू न दिलेलं planning, तोरण्याचा चढ चढताना झालेली अवस्था, आम्ही खाली थांबलेलो असताना आदित्यच्या वरून मारलेल्या हाका, "अरे गाडी अर्ध्यापर्यंत आली असती" हे पिनाकचं पूर्ण ट्रेकभर प्रसिद्ध झालेलं वाक्य, अमेयनी खुप planning करून आणलेल्या २० पुरणपोळ्या, पिनाकनी dehydration ना होण्यासाठी वाटलेली चोकलेट, तोरणा ते बुधला इंदापूरकरकाका आणि भोपटकर काकांशी मारलेल्या गप्पा, राजगड-तोरण्याच्या वाटेवर मानसीनी काढलेली लांबलचक झोप, तन्मय-अमेयनी सगळ्या मापांची वाट लाऊन केलेला अफलातून चहा, भागोजींच्या झापावर कौस्तुभ, निमीषा, अश्विनी, विराज, परिन यांनी गायलेली रफी, किशोर यांची गाणी, मानसीनी गायलेलं "लाग जा गले... " हा तर त्या मैफिलीचा कळस, भागोजींच ते गूढ संभाषण, दव समजून स्वतःच्याच बाटलीतून सांडलेल्या पाण्यात झोपलेला तन्मय, बसमधे अमेयची हिशोब करताना झालेली तारांबळ आणि सगळ्यात शेवटी "खूप मजा आली मुलांनो, छान तयार झाला आहात" हि शमांगी ताईनी दिलेली शाबासकी .... और क्या चाहिये .... या अश्या आठवणींमुळेच तर नुसता 'पूर्ण' झालेला ट्रेक 'सुफळ संपूर्ण' होतो ... नाही का ?




मस्त
ReplyDeleteमस्त लिहिलंय मंगेशराव! आवडलं..
ReplyDelete