Tuesday, 6 October 2015

सह्यांकन २०१३ पायलट

" हे सह्यांकन म्हणजे काय रे मित्रा ??", मानसने त्याच्या अस्सल कोल्हापुरी टोन मध्ये प्रश्न टाकला. मानस म्हणजे माझ्या ऑफिसमधला माझ्याबरोबर  मित्र. मी मुबैच तर तो कोल्हापूरचा. पण तरी आमच्या दोघांचीही नाळ सह्याद्री या एका गोष्टीशी जोडली गेली होती. साहजिकच मिळणाऱ्या सुट्ट्या आम्ही सह्याद्रीच्या सानिध्यात सत्कारणी  होतो. असंच एकदा मी, मानस आणि शशांक रतनगडाच्या नेढ्यात बसलो होतो.  महाराज, सह्याद्री, गड, किल्ले अश्या चौफेर गप्पा चालू होत्या. बोलता बोलता २००५ च्या सहयांकन चा विषय निघाला आणि लगेच मनासने वरचा प्रश्न टाकला. मी त्याला, जमेल तस समजवायला  सुरुवात केली कि, सहयांकन  ,त्याची रूपरेषा, मार्गाची निवड, पायलट वगैरे वगैरे … तेवढ्यात शशांक मानसला म्हणाला, " अरे, सहयांकन  नुसती आईकायची गोष्ट नाही, अनुभवायची गोष्ट आहे ".
भले शाब्बास !!… किती सोप्या शब्दात समजावल, खरच ! सहयांकन  एका वाक्यात सांगून संपणार नाही कि अख्ख्या  पुस्तकातही मावणार नाही. काही जणांसाठी सहयांकन  हि पाच दिवसांची स्वैर भटकंती आहे, काहीजणांसाठी निसर्गाचा मुक्तपणे घेतलेला आस्वाद आहे,  काहीजणांसाठी सहयांकन  हि निव्वळ एक नशा आहे …. निव्वळ नशा
आणि म्हणूनच गेली ३० वर्ष "चक्रम" हा जगन्नाथाचा रथ अव्याहतपणे ओढताहेत. दरवेळी आपण काय नवीन करू  विचार. त्यातूनच नवे नवे अतरंगी मार्ग निघतात. जसं  २००७ चं  सागरी सहयांकन. हेतू हाच की, महाराजांना पोर्तुगीज, इंग्रज, डच यांच्या तोडीचं बलाढ्य आरमार उभं  करायला  मदत करणाऱ्या सागरी दुर्गांच  सर्वांना दर्शन व्हाव. किंवा २००९ च सहयांकन, नळीच्या वाटेवरच ! महाराष्ट्राचं  राकट, कणखर, दगडांच्या देशा हे रूप सर्वांनी पाहावं म्हणून.
या वर्षी नवीन काय ? शिवरायांना जेवढी साथ गडकिल्ल्यानी दिली, तितकीच मदत इथल्या जंगलांनी हि केली. याच जंगलांमधेच  भ्रमंती केली तर ? कल्पना छान. तसंही सह्याद्री म्हणजे काही फक्त पहाड नाही. त्या पहाडाचे रौद्र भीषण कडे, त्या  कड्यावरून खाली झेपावणारे धबधबे, त्यांच्याच पुढे तयार झालेल्या नद्या, अश्या नद्यांची विविध खोरी, त्या खोऱ्यामधली टुमदार गावं, अश्याच एखाद्या गावातला आमचा धनगर वा ठाकर भाऊ … हि सगळी त्या सह्यदेवाचीच रूपं. 
मार्गपण काय भन्नाट !!! आल्हाददायक  सावित्री घाट - थरारक निसणीची वाट - महाबळेश्वर - कोळेश्वर - रायरेश्वराचं कोकणाकडे पसरलेलं नाखिंद्याचं  पठार - दुर्गची  जनिआई - समर्थांची शिवथरघळ - मढे घाट मार्गे केळद - रायलिंग पठार - सिंगापूर नाळ …. सह्याद्रीतल्या या देवांची वारीच जणूकाही. पायलट मध्ये हि वारी करायचं हे मनोमन ठरवलं.

पहाटे दाभीळ गावात पोहोचलो. तिथल्या  मंदिरात घडलेला प्रसंग काळजात कोरला गेला. आम्ही त्या दिवसाची रूपरेषा ठरवत होतो. आणि अचानक तिथे मंदिरात विठ्ठलाच्या दर्शनाला आलेल्या आजीबाईनी देवदर्शन झाल्यावर चक्क आमच्या पायाला हात लाऊन नमस्कार केला. आम्ही ओशाळलो, पटकन मागे झलो. म्हटलं, " आजी, बरंच लहान आहोत आम्ही तुमच्यापेक्षा " त्यावर त्या म्हणाल्या," तर व्ह … पण मानुसच हात नव्ह!"  आमची गुल. दगडातल्या देवापेक्षा माणसातल्या देवाला मानणाऱ्या त्या माउलीचे आशीर्वाद घेतले आणि पुढे निघलो.  
दाभीळहून एक रस्ता "दऱ्या"च्या अंगाने वाडा कुंभरोशीपर्यंत जातो. अगदी सुंदर जंगल. एवढा दाट कि सूर्याची किरणं आमच्यापर्यंत पोहोचतच नव्हती. इथल्या सावित्री नदीमुळे या घाटाला सावित्री घाट म्हणतात. पूर्वी हे सगळं जंगल जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांच्या ताब्यात होता म्हणे. याच जंगलाच्या पोटात बसून मग्रूर चंद्रराव शिवरायांना आव्हान देतो. "येता जावळी - जाता गोवळी""बदफैली केलीया मारले जाल" असे वाक्प्रहार एकमेकांवर होत राहतात. 
अखेर जावळी स्वराज्याला शरण येते. मुरारबाजी, रायरी सारखी रत्ने स्वराज्याला लाभतात. याच रानात कधीकाळी महाराजांचं सैन्य दौडल  असेल, इथेच कुठेतरी स्वराज्याच्या मर्द मावळ्यांनी मोऱ्याच सैन्य काढलं असेल… डोक्यात हे विचार घोळत असतानाच वाडा कुंभरोशीचा गाडीरस्ता लागला. दरे गाव इथून साधारण ८-१० किमी वर आहे.
दरे गावातून महाबळेश्वर (सौजन्य : अमेय गोखले )

 दरे गावातून समोरच महाबळेश्वरचं पठार दिसतं. त्यावरची सगळ्यात समोर दिसणारी उभी डोंगरसोंड चढून जायची. वाटेत छोटासा कातळ लागतो. गावातले लोक याला "निसण" म्हणतात. आणि या वाटेला निसणीची वाट. तेवढा चढ चढून आपण वरच्या सपाटीला येतो. आणि महाबळेश्वरच्या मढीमहल (ऑर्थर सीट ) च्या रस्त्याला लागतो.
निसाणीची वाट  (सौजन्य : अमेय गोखले )

आणि त्याच रस्त्याला समांतर जंगलातून चालत क्षेत्र महाबळेश्वरला पोहोचतो.
सह्याद्रीच्या कुशीत विराजमान झालेल्या त्या सह्याद्रीच्या स्वामीच्या चरणी नतमस्तक झालो आणि जोर गावाच्या दिशेनी वाट वाकडी केली. मालवणी पॉइन्टवरच्या गणपतीच दर्शन घेतल. डावीकडे कोळेश्वरचं हिरवगार पठार, उजवीकडे पसरलेलं महाबळेश्वर आणि या दोघांच्या बेचक्यात असलेल्या बलकवडी धरणाच्या पाण्याचा फुगवटा, …. काय सुंदर दृश्य.
मालवणी पॉइन्टवरून दिसणारे दृश्य  (सौजन्य : अमेय गोखले )

पटापट ती डोंगरसोंड उतरलो आणि गावात पोहोचलो. कुंभालजा मातेच नदीकाठी वसलेलं सुंदर देऊळ. राहायला याहून ५ स्टार जागा कुठून मिळणार. आज जेवायला पाव भाजी …. वा वा …. सुग्रीव  (बाप्या सुगरणला दुसर काय म्हणतात?) महेशने अगदी झक्कास केली . आणि मदतीला आम्ही सगळे कॉमी ३ (चिराचिरी करणाऱ्यांना हाटेलात अस नाव आहे म्हणे … इति भाऊ ). क्षणार्धात त्या पाव भाजीचा फन्ना उडवला आणि आकाशीचे तारे बघत झोपी गेलो. 
दुसऱ्या दिवशी आम्हाला समोरचं कोळेश्वरचं पठार पार करून जांभळीत उतरून पुढे नाखिंद्यावर चढायचं होतं. कोळेश्वर चढून पठारावर आलो तेव्हा उन्ह चढत होती. पठारावरच्या जंगलात शिरलो आणि धनगरवाड्याची वाट तुडवायला लागलो. केंजळ- कमळ होतेच सोबतीला. सुर्व्यादेव डुईवर आला तरी कोळेश्वराचं जंगल थंडच. उन्हाचा तडाखा जराही जाणवू नये एवढं घनदाट जंगल.
कोळेश्वरचे जंगल
कोळेश्वराच्या मंदिराशी घटकाभर विसावलो. कोळेश्वर महादेवाला दंडवत घातलं. ठेपले-सांजच्या पोळ्या यथेच्च हाणल्या. आणि पुन्हा पायगाडी चालू केली.
कोळेश्वर महादेव

धनगरवाडा ओलांडून पठाराच्या दुसऱ्या  टोकाकडे निघलो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गव्हाची हिरवीगार शेती मन प्रसन्न करून गेली. पठाराच्या दुसऱ्या टोकाशी आलो. नाणेघाटाची आठवण करून देईल अशी ,  किंबहुना त्याहून अरुंद वाट खाली जांभळी गावात उतरते. रस्ता शोधत शोधत, मार्किंग करत करत खाली पोहोचायला संध्याकाळ झाली. धरणाचं पाणी वाढल्याने त्या पाण्याला वळसा घालून जांभळी गावात पोहोचायला अजून एक तासभर खर्ची पडला. आणि नाखिंदा  चढायचा बेत एक दिवस पुढे ढकलला गेला.


कोळेश्वर (सौजन्य: तुषार तुपे)
रात्री पुढच्या मार्गावर चर्चा झाली, यापुढचा मार्ग नखिन्द्यावरून पाठशीळा मार्गे मोहनगडाकडे जातो असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. वास्तविक पाठशीळा हे नाखीन्द्याचं एक टोक. पण ते नेमकं कुठल हे काही कळत नव्हतं. जांभळीकर आप्पा झाडेच्या मते असा कुठलाच रस्ता नाही. आम्ही शॉक!! काय करावं … आप्पा आम्हाला नाखीन्द्यावर चढवून मागे सांबरदऱ्यामार्गे कुडली गावात उतरवून द्यायला कबूल झाले.  शेवटी सर्वानुमते तीन-तीन जणांचे  २ गट  करण्यात आले. एक गट कुडलीत उतरून कुडली-नाखिंदा-पाठशिळा या मार्गाची पाहणी करेल आणि दुसरा गट कुंडला जाऊन पुढचा टप्पा पूर्ण करेल, अस ठरलं. 

सकाळी सगळे एकत्रच निघालो. जांभळीहून नाखिंदा चढायला साधारण अडीच तास लागले. दाट जंगल … आणि त्यात खांद्यापर्यंत वाढलेल्या गवताची भर! काय सुंदर दिसत होता सगळं !! गवतामधेच सोनकीच्या फुलाचे पिवळे पुंजके जंगलाच्या सौंदर्यात अधिकच भर घालत होते. आकाशात घुसलेल्या त्या नाकाच्या आकाराच्या कड्याला उजवीकडे ठेवत माथ्यावर पोचलो. उजवीकडे पसरलेलं रायरेसुराचं लांबच लांब पठार आणि डावीकडे पसरलेल हिरवागार घट्ट रान. ठरलं … इथेच छावणी !! घोंघावणारा वारा अंगावर घेत रायरेश्वराच्या दिशेनी चालू लागलो.
नाखिंद्याचा चढ (सौजन्य: तुषार तुपे)

दूरवर एक धनगर मेंढ्या वळत होता. नमस्कार चमत्कार झाल्यावर त्यांनी विचारल, " कुठशी निघालाय?" आम्ही कुडली म्हणून सांगितलं आणि दुसरा रस्ता आहे का ते विचारल. " हाये !! पर कुनी वापरत न्हाई . त्ये तिथशी टोक दिसतंय का (हेच पाठशिळा … सापडल बुवा एकदाचं ) तिथनं उतरत्ये बगा वाट खाली. इथं धानिवली म्हनून गाव हाय … तिथला कुनीबी यील कि तुमच्यासंग तिथवर"
बस्स !! आधाशासारख धावत धानिवलीत पोचलो. अमोल, प्रणव आणि अनिकेत गावात राहिले आणि आम्ही पुढे खाली कंकवाडीत उतरलो. शेवटची यष्टी थोडक्यात चुकली. शेवटी गावातल्या गणेश कंक यांच्या घराच्या ओसरीवर पथारी पसरली. कंकांच्या वडलांनी मोठ्या आस्थेनं विचारपूस केली. आमच्या आदरातिथ्यासाठीचा 'वशाट'करण्याचा बेत आमच्या शाकाहारीपणामुळे रद्द करावा लागला. जेवायला पिठलं, गरमागरम भाकऱ्या,वांगी बटाटा, पापड, कुरडई आणि वाफाळता भात, वर घरच घट्ट दही …. ट्रेक सार्थकी !!!
पाठशिळा (सौजन्य : अमेय गोखले)
दुसऱ्या दिवशी निगुडघर-धारमंडपमार्गे कुंड गावात पोचलो. खुट्याच्या रस्त्याने शिवथरघळीत उतरलो.
ज्या काळात लहानगा शिवबा या सह्याद्रीत बागडत होता त्याच काळात विश्वाची चिंता करणारा एक साधू या सह्याद्रिनी पहिला. देहाने बलवंत अश्या या योग्याच्या चेहऱ्यावर तपश्चर्येचे तेज होते. स्वामीजी गावोगावी जयघोष करत होते " जय जय रघुवीर समर्थ " या सह्याद्रिनी स्वामीजींना खुणावले. समर्थ सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर चढले. सह्याद्री त्यांचा मित्रच बनला जणू! वन, गुहा, कडेकपाऱ्या हि तर समर्थांची प्रिय स्थळच होती. अशाच शिवथर घळीत समर्थांनी दासबोधासारखा महान ग्रंथ लिहून पूर्ण केला. त्या जागेच दर्शन घ्यावं , आपलं जीवन कस्पटासमान मानावं !
घळीच्या वरून एक सुंदर धबधबा खाली कोसळतो. महाराष्ट्रातल्या डोंगर भटक्यांना वेड लावणारं पवित्र आणि रमणीय अस हे ठिकाण. स्वतः समर्थच आपल्या या प्रिय जागेच वर्णन करताना लिहितात:
गिरीचे मस्तकी गंगा । तेथून चालली बळे ।
धबाबा लोटती धारा । धबाबा तोय आदळे ।
गर्जतो मेघ तो सिंधू । ध्वनीकल्लोळ उठिला ।
कड्यासी आदळे धारा । वात आवर्त होतसे ।

कुंड ते शिवथरघळ (सौजन्य: तुषार तुपे)

आम्ही शिवथर घळीत उतरलो त्याच दिवशी दुसरा गट धनिवलीतून निघून नाखीन्द्यावर आला आणि जंगलात घुसला. चौघेही (अमोल, अनिकेत, प्रणव आणि वाटाड्या ) रस्त्यातली झाडी कापत पाठ्शीळा टोकापर्यंत पोचले आणि तिथून खाली कुडलीत उतरले. मोहिमेत पुढच्या टप्प्यात मोहनगड चढायचा होता. कुडलीतून समोर पागोट्यासारखा दिसणारा तो मोहनगड. गडाला इथले लोक दुर्गची 'जनी' अस म्हणतात. पंचक्रोशीतल्या लोकांचं ते आराध्य दैवत.
शिवथर च्या पुढे मढे घात चढून केळदला पोहोचायचे. मढे  घाटाची सुरुवात पडवळकोंड गावातून होते. गावात पेशवेकालीन बाव (विहीर)आहे. सुंदर बांधणीची, पायऱ्यांची हि विहीर एकदा बघावी अशीच. तिथूनच घाट चढायला सुरुवात होते. सिंहगडाच्या लढाई नंतर तानाजीच शव (मढ) याच घाटातून उतरवून उमरठ या त्यांच्या गावी नेण्यात आल होतं. तेव्हापासून या घाटाला मढे घाट असं नाव पडलं.
घाट चढून केळदला पोहोचायला साधारण दोन तास लागतात.  केळद ते मोहरी गाडीरस्ता झाला आहे. गाव तिथं यष्टी हे धोरण पायवाटा लुप्तच करणार कि काय ? ...... याच वाटेने चालत आपण पुढे रायलिंग पठारावर पोहोचतो. राजगड तोरणा पूर्णवेळ आपली साथ करत असतात.
लिंगाण्याच खर सौंदर्य पाहावं ते रायलिंग वरूनच. महाराष्ट्राचं Matter Horn  !! बघूनच थरकाप उडवा असे चाहु बाजूनी ताशीव कडे. ... आणि मधून शिवलिंगासारखा उंचावलेला 'लिंगाणा'. दूरवर रायगडाच टकमक टोक खुणावत होतं.
रायलिंग पठारावरून लिंगाणा 

हे सगळं नजरेत साठवत मागे फिरलो आणि सरळ सिंगापूरच्या नाळेची वाट धरली. हि वाट लिंगाण्याच्या डाव्या अंगाने खाली कोकणात उतरते. सावधपणे उतरत, मधे मधे घसपटत ठेचकळत दापोली गावात उतरलो. इथे मोहिमेची सांगता होणार... आनंद हि आणि दुःख हि असणार!
आनंद याचा कि पार दाभीळ पासून सुरु केलेली हि आडदांड मोहीम इथे कोकणांत पूर्ण केली. दुःख याचा कि ज्यांच्या साथीनं केली त्या कुटुंबाचा निरोप घ्यावा लागणार. ज्या सह्याद्री च्या साथीनं केली त्या सह्याद्रीचा निरोप घ्यायचा. याच विचारात परतीच्या प्रवासाला लागलो.
परतीच्या प्रवासात समर्थांचे शब्द कानात रुंजी घालत होते.
त्रैलोक्य चालिल्या फौजा |
सौख्य बंध विमोचने |
" मोहीम " मांडली मोठी |
आनंदवनभूवनी |
|| जय जय रघुवीर समर्थ || 

- मंगेश माधव पंडित


No comments:

Post a Comment