Wednesday, 21 December 2016

तोरणा-राजगड | सुफळ संपूर्ण

|| झाले बहु, होतील बहु, आहेतहि बहु, परंतु या सम हा ||

राजगडाचं याहून सुंदर वर्णन होऊच नाही शकत. पूर्वेला पसरलेली नितांत सुंदर "सुवेळा", आपल्या पूर्वजांची स्थापत्यकला दाखवून आपल्याला तोंडात बोटं घालायला लावणारी "संजीवनी", आलेल्या सर्व सह्यगड्यांच आदरातिथ्य करणारी "पद्मावती" आणि या सर्वांच्या गराड्यात गडाच्या कणखरतेची साक्ष देत मध्यभागी उंच उभा असलेला बालेकिल्ला! बस बघतच राहावं !!

सुवेळाच्या नेढ्यात पहाटे पहाटे जाऊन बसलोय. सगळीकडे बऱ्यापैकी काळोखच आहे. पक्ष्यांची किलबिल त्या शांत वातावरणाला आल्हाददायक करून टाकतेय. पहाटेच्या थंडगार वाऱ्यांनी अंगावर सुखद शहारे आणलेत. पाठीशी बेलग बालेकिल्ला त्या सुर्यनारायणाला मुजरा करायला तयार झालाय. ते वाऱ्याचे झोत अंगावर घेत पूर्वेकडे बघायला लागतो. आकाशाच्या कॅनवासवर रंगांची उधळण करत, तांबडफुटी या नावाला सार्थ करत तो तेजाचा स्वामी दर्शन द्यायला लागतो. हात नकळत जोडले जातात. योगायोग म्हणून कि काय दूरवर महाराजांच्या नावानी घोषणा सुरु होतात.  " ...... राजा शिवछत्रपती कि" .... " जय SSSSSSSS " म्हणताना उर अभिमानानी भरून येतो.


"उठ बे उठ ...... झोपतो काय !!!! सकाळ झाली !!!.... उशीर झाला !!!!! ..... उठ झोपू नको !!!! ..... चल... !!"
या शब्दांनी अमेयनी मला स्वप्नातून सत्यात आणलं. टेंटच्या बाहेर डोकावून बघितलं तर अजून काळोखच होता.
"किती वाजले ? " ... इति तन्मय .
"काय माहित ..... बघतो ! .... अरे ४ च वाजलेत " - अमेय
"मग एवढ्या लवकर काय करायचंय उठून .... झोप !!! " तन्मय

तिघंही पुन्हा झोपी गेलो. तोरण्यावरून सुरु केलेल्या यात्रेमधे आम्ही भागोजींच्या झापापाशी मुक्काम केला होता. रात्री उघड्यावर झोपण्याऐवजी आम्ही टेंट लावले (एवढं वजन उचलून आणलंय ते काय उगाच ? हा देखील एक हेतू ).


५.३० -६ च्या दरम्यान उठलो. तसंही अमेयनी कोंबडा आरवण्याची कर्णकर्कश्य अलार्म टोन लावली होती. त्यामुळे उठायला कष्ट पडले नाहीत (किंवा जास्तच कष्ट पडले ... अभी जैसी जिसकी सोच )
अमेय - तन्मयनी फक्कड चहा बनवला.


सगळ्यांनी आवरा-आवरी करायला सुरुवात केली. बऱ्याच कष्टानंतर ३-४ वेळा हाका मारल्यावर पिनाक साहेब टेंट मधून बाहेर आले. आणि शेवटी आम्ही टेंट उतरवायला घेतला. सगळ्यांनी नाष्टा करून घेतला. साधारण ६.३०-७ च्या सुमारास राजगडाकडे कूच केलं. मी , आदित्य, तन्मय आणि अमेय तेवढे मागे थांबलो. टेंट वगैरेची सगळी आवराआवर केली. कचरा जमा करून सगळं स्वच्छ केलं. अधिकचं सगळं समान, शिधा भागोजींना दिला आणि त्यांचा निरोप घेऊन आम्ही देखील राजगडाकडे निघालो.

बाकीचे आम्हाला दूरवर दिसत होते. बरेच पुढे पोचले असणार. काही वेळात माचीवर पोचतीलहि. " चला ! पटापट जाऊया !" - नेहमीप्रमाणे आदित्यचा सल्ला. रस्ता बऱ्यापैकी सरळ सरळ होता. चुकण्याचा काही प्रश्न नाही. २-३ टेकड्या पार केल्या. एक-दोन ग्रुप भेटले. तोरण्याकडे जात होते. त्यांना पुढच्या मार्गाची माहिती पुरवत-पुरवत मार्गक्रमण चालू होते. पाली- भुतोंडे रस्ता आडवा आला आणि राजगड खूपच जवळ आल्याचं लक्षात आलं.

पुन्हा काही हौशी लोकं भेटली. तोरण्याबद्दल विचारणा झाली. सगळे अगदीच नवखे दिसत होते. गिर्यारोहणाशी फारसा संबंध नसावा. फक्त महाराजांवर असलेल्या भक्तीने हे करायचं मनात आणलं असावं.
"अजून किती लांब म्हनलात तोरणा ? " - त्यातल्याच एकाने पुन्हा एकदा विचारणा केली
"५-६ तास तरी लागतील" - आदित्य
"बाब्बो .... एवढं आहे का अजून ? " ... अचंबा मिश्रित असहाय भाव.
"पाणी भरून घ्या फक्त मधे ... नंतर direct तोरण्याला पाणी लागेल" आम्ही सल्ला देऊन पुढे निघालो.
लोकांमध्ये असे ट्रेक करायची इच्छा होते हि चांगली गोष्ट आहे, पण त्यासाठी लागणारी पूर्वतयारी कुठेतरी कमी पडते. एकंदर गिर्यारोहण या बाबतीतच जागरूकता येणं, सुरक्षेबद्दल समज येणं खूप महत्वाचं आहे.

राजगडाचा शेवटचा चढ सुरु झाला. बाकी सर्वजण "संजीवनी" वर कधीच पोचले होते. चढ संपला आणि आम्ही संजीवनीच्या शेवटच्या बुरुजाच्या खाली येऊन पोचलो.





"महाराजांच्या काळात कसलं जबरी दिसत असेल ना हे !! ... सगळ्या बुरुजांवर भगवे फडकतायत, बाराबंदी- पगडी घालून मावळे बुरुजा-बुरुजांवर उभे आहेत. तोफा धडाडत आहेत, मराठ्यांचं घोडदळ 'जंग जीतन चलत' आहेत. " .... मी आणि तन्मय त्या भूतकाळातच रमलो होतो. एकदा इतिहासाचा विषय निघाला कि दुसरा कोणताही विषय लागत नाही. त्या गप्पांमध्ये अळू दरवाजा केव्हा ओलांडला तेच कळल नाही. त्या संजीवनी माचीच सौंदर्य डोळ्यात साठवत घटकाभर तिथेच विसावलो. संजीवनी माचीला दुहेरी तटबंदी आहे अर्थात आतल्या तटबंदीला बाहेरून दुसऱ्या तटानी सुरक्षित केलंय. बुरुज देखील चिलखती आहेत. स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना !!

सौजन्य : निलेश साळवी 

माची पार करून मुख्य रस्त्याला लागलो. बाजूलाच झाडाच्या सावलीत एक मामा ताक/ लिंबू सरबत घेऊन बसलेले. मस्त २-३ ग्लास भरून ताक - सरबत पिऊन झालं. "मामा, अजून किती ताक उरलंय तुमच्याकडे ? " - अमेयच्या डोक्यात काय आला कुणास ठाऊक ! "द्या मामा सगळं ताक " असं म्हणून बाटलीभर ताक घेतलं.


आता जास्त वेळ न घालवता पटापट सदरेपाशी पोहोचलो. बाकीचे सगळे आमची वाटच पाहत बसले होते.
"बालेकिल्ल्यावर कोण येणार ? " अमेयनी विचारलं. सगळ्यांनी राजगड या आधी केलेला असल्याने त्यांचा बालेकिल्ला आधीच पाहून झाला होता. अमेय, मानसी, शमांगी ताई आणि परिन बालेकिल्ल्याच्या दिशेने वळले. आणि आम्ही आमचा मोर्चा पद्मावती माचीकडे वळवला.

अपेक्षेप्रमाणे पद्मावती आईचं मंदिर "पर्यटकां"नी व्यापलं होतं. समोरच्या धर्मशाळेच्या ओसरीवरच आम्ही sack उतरवल्या. करायला काही काम नव्हतं - गप्पांना उधाण आलेलं. निमिषा, विराज, पिनाक, अश्विनी, तन्मय, आदित्य, भोपटकर काका, इंदापूरकर काका, गप्पांचा लई बेष्ट फड जमलेला. हळू हळू चकली, चिवडा, बिस्किटं असले खादीचे पदार्थ निघायला लागले.

राजगड पूर्णपणे गजबजलेला असतो आजकाल. पाली दरवाज्याचा रस्ता बराच सोप्पा केलाय. शिवाय गावकरी वरपर्यंत जेवणाची सोय करून देतात. त्यामुळे पर्यटक/ हौशी गिर्यारोहक/ "शिवभक्त" यांची गडावर शनिवार-रविवारी चांगलीच गर्दी असते. हृषीकेश यादव सरांनी मोठ्या कष्टानी स्वच्छ करवलेला पद्मावती तलाव, ठाण्याच्या तलावपाळीसारखा गर्दीच्या विळख्यात. आम्ही बसलेलो त्या ओसरीच्या एका कोपऱ्यात काही मुलं चूल वगैरे लाऊन maggi करत होते. mobile वर टिपिकल हळदीची गाणी मोठ्या आवाजात लावली होती. नंतर तन्मयनी थोडीशी "विचारपूस" केली आणि त्या मुलांनी आतली अक्खी एक खोली स्वच्छ करून दिली.

थोड्या वेळानी बालेकिल्ला टीम परत आली. मानसीने गुंजवण्यातून आधीच जेवणाची सोय केली होती. ते देखील पोहोचले. (तन्मय नी जेवणाला अक्षरशः "रस्त्यातच गाठले" म्हणा ना ). आतल्या खोलीत जेवणाची पंगत बसली. चवळी बटाटा रस्सा भाजी, मोठ्ठाली तांदुळाची भाकरी, झणझणीत मिरचीचा ठेचा, डाळ, भात ... काय मजा आली राव जेवताना ... दिल खुश कर दित्ता !!!!
थोडा वेळ विश्रांती घेऊन राजगड उतरायला सुरुवात झाली. मजल दरमजल करत संध्याकाळी ४-५ च्या सुमारास गुंजवण्यात पुरोहितांच्या हॉटेलात पोहोचलो..... पुरानी यादे ताजा हो गई!!  .... पुढच्या वेळी कोणते ट्रेक करायचे याची "चाय पे चर्चा" झाली.



राजगड तोरणा ट्रेक पुन्हा एकदा पूर्ण झाला होता.  पण प्रत्येक ट्रेक आपल्याला देतो त्या ट्रेकच्या आठवणी. आयुष्यभर लक्षात राहतील अश्या. शेवटपर्यंत थांगपत्ता लागू न दिलेलं planning, तोरण्याचा चढ चढताना झालेली अवस्था, आम्ही खाली थांबलेलो असताना आदित्यच्या वरून मारलेल्या हाका, "अरे गाडी अर्ध्यापर्यंत आली असती" हे पिनाकचं पूर्ण ट्रेकभर प्रसिद्ध झालेलं वाक्य, अमेयनी खुप planning करून आणलेल्या २० पुरणपोळ्या, पिनाकनी dehydration ना होण्यासाठी वाटलेली चोकलेट, तोरणा ते बुधला इंदापूरकरकाका आणि भोपटकर काकांशी मारलेल्या गप्पा, राजगड-तोरण्याच्या वाटेवर मानसीनी काढलेली लांबलचक झोप, तन्मय-अमेयनी सगळ्या मापांची वाट लाऊन केलेला अफलातून चहा, भागोजींच्या झापावर कौस्तुभ, निमीषा, अश्विनी, विराज, परिन यांनी गायलेली रफी, किशोर यांची गाणी, मानसीनी गायलेलं "लाग जा गले... " हा तर त्या मैफिलीचा कळस, भागोजींच ते गूढ संभाषण, दव समजून स्वतःच्याच बाटलीतून सांडलेल्या पाण्यात झोपलेला तन्मय, बसमधे अमेयची हिशोब करताना झालेली तारांबळ आणि सगळ्यात शेवटी "खूप मजा आली मुलांनो, छान तयार झाला आहात" हि शमांगी ताईनी दिलेली शाबासकी .... और क्या चाहिये .... या अश्या आठवणींमुळेच तर नुसता 'पूर्ण' झालेला ट्रेक 'सुफळ संपूर्ण' होतो ... नाही का ? 

Friday, 2 December 2016

तोरणा-राजगड | पूर्वार्ध

सह्याद्री च्या कुशीत, निसर्गाच्या सानिध्यात एक छोटंसं टुमदार घर असावं. चारही बाजूंनी डोंगर दऱ्यानी वेढलेलं. ३-४ किल्ले हे असे हाकेच्या अंतरावर !!! रात्रीच्या बोचर्या थंडीत मस्त उबदार शेकोटी लावलीये. मुकेश, किशोर, रफी, मन्नादा, लता, आशा, RD, SD, यांचे स्वर, गीत ऐकत, रात्रीची चांदणी न्याहाळत झोपी जावं !
या सह्याद्रीशी गट्टी जमल्यापासूनचं माझं हे स्वप्नंच तोरणा-राजगड ट्रेकच्या निमित्तानं काही प्रमाणात का होईना पूर्ण झाल. भागोजीच्या झापासमोरच्या अंगणात शेकोटी पेटली होती. जुने-नवे चक्रम एकत्र होते. मग काय ... जुन्या गाण्यांची धमाल मैफिल जमली ना राव !! अक्ख्या दिवसाचा शीण कुठच्या कुठे गायब.

स्वराज्यातला पहिला किल्ला आणि स्वराज्याची पहिली राजधानी ! दोन दिवसाचा जबरी ट्रेक ! अशी संधी कोण सोडणार. आदित्य , अमेय, मानसी यांचा प्लान शेवटपर्यंत बदलतच होता. आधी राजगड-तोरणा, मग रात्री तोरणा चढून दुसर्या दिवशी राजगड अस काहीतरी. दर वेळी मी "काय ठरलं शेवटी ?" असं विचारलं कि नवीनच काहीतरी प्लान कळायचा. शेवटी एकदाचा प्लान ठरला. राजगडावर असणारी "जत्रा" लक्षात घेऊन आम्ही राजगड-तोरणा ऐवजी "तोरणा-राजगड" करायचं ठरवलं. तसाही माझा तोरणा पूर्ण बघायचा बाकीच राहिल होता. सिंहगड-रायगड ट्रेक च्या वेळी तोरणा फक्त ओलांडला होता बुधला माचीवरून... आता तोरण्यावरून राजगडापर्यंतची वाटचाल करू ...... कुछ हटके हो जाये !!!

ठरल्या रात्री सगळे चक्रमवर भेटलो. रात्री तोरण्याच्या पायथ्याला म्हणजे वेल्ह्याला जाऊन राहायचे आणि लवकर निघून तोरणा चढायचा असं ठरलेलं. आमचे परममित्र ओंकार शेठ ओक उर्फ टोम्या यांच्या मार्गदर्शनाखाली planning झालेलं, ते कसं चुकणार !! "अबे, माझ्या घरावरुनच जाणार ना तू .. निघाला कि सांग , येतो भेटायला..."इति ओंकार. "सांगतो कि, पण उशीर होईल रे उगाच तुला झोपायला ... त्यात तू पुण्याचा", " ये ये आहे मी जागा, लिहायलाच बसलोय"

 रिवाजाप्रमाणे बस काही वेळेवर आली नाही. मुलुंडच्या "मंडपा"त चहाचा पहिला कार्यक्रम पार पडला. चहाचा एक फोटो ओंकारला पाठवला. " साल्या, निघाला नाही अजून?" ...  निघायलाच बराच उशीर होईल म्हणून ओंकारला पुढच्या वेळी भेटण्याचं कबुल केल आणि परत चक्रमशी येऊन थांबलो.  शेवटी मध्यरात्री आमचे सारथी डायवर गाडी हाकीत आम्हाला न्यायला आले. "गणपती बाप्पा मोरया" म्हणत आम्ही बसमध्ये बसलो आणि गाडीने पुण्याचा रस्ता धरला. पुण्याला शमांगी ताई, अश्विनी यांनी कोरम पूर्ण केला. पुढे पिनाकच्या सखोल मार्गदर्शनाखाली गाडी नसरापूर फाटा- वेल्हा रस्ता पार करून वेल्ह्यात पोहोचलो.

गाव अजूनही गुलाबी थंडीची चादर ओढून झोपलेलंच होतं. तिथल्याच एका पडवीत थोडावेळ विसावलो. काही वेळातच हॉटेलवाल्यानी दार उघडलं आणि चहाचा दुसरा अध्याय पार पडला. बाहेरहि उजाडायला सुरुवात झाली होती. नाष्ट्याला झक्कास मिसळ-पाव. कोणत्याही ट्रेकला जर एकदाही मिसळ नसेल तर तो माझ्या मते फाउल मानला जातो. हॉटेलात इतरही पर्यटक/ हौशी ट्रेकर्स यायला सुरुवात झाली. आम्ही "चक्रम" असल्याचं समजल्यावर त्यांना खूपच आनंद झाला. त्यातल्या बऱ्याच जणांनी "सह्यांकन" मधे सहभाग घेतला होता. "चक्रम" हे नाव ऐकल्यावर त्यांनी ज्या आदरानी/ आश्चर्यानी आमच्याकडे पाहिलं, त्यामुळे चक्रम शी जोडला गेल्याचा पुन्हा एकदा अभिमान वाटला.

"चला ! चला ! चला ! .... " अमेय, मानसीच्या हाका सुरु झाल्या. ट्रेकला सुरुवात करायची वेळ झाली. मानसी, अमेय यांनी एका वाटाड्याशी आधीच बोलून ठेवलं होतं. सीताराम त्याचं नाव ... ते आम्हाला तोरण्यापासून राजगडापर्यंत सोबत करणार होते. पिनाक आणि सीताराम मामा यांच्यात पुढील मार्गावर "सखोल" चर्चा झाली आणि यापुढे गाडी जाणार नाही असं ठरलं. Sack पाठीवर चढवून आम्ही तोरण्याच्या दिशेनी चालू लागलो.



वेल्ह्यातून तोरणा 

पुढच्या पाचच मिनिटात चढ सुरु झाला आणि आम्हाला पुढच्या मार्गाची कल्पना आली. बाकी सगळे कधीच पुढे निघून गेले होते. मी, तन्मय, मानसी, अमेय तेवढे मागे राहिलो होतो. वाटेत ताक, लिंबूसरबत यांच्या जोरावर आम्ही किल्ल्याच्या अर्ध्यावर पोहोचलो. तोरण्याचा आवाढव्य पसारा त्याच्या "प्रचंड"पणाची साक्ष देत होता. तेवढ्यात किल्ल्यावरून दुसरा एक ग्रुप खाली येत होता. त्यातल्या एकाशी थोड्या गप्पा झाल्या. पुण्याचा कोणतातरी ग्रुप होता. १५० लोकांचा .... आणि बरोबर ट्रेकिंग येत असलेले मोजकेच असावेत. बऱ्याच लोकांच्या पायात आवश्यक बूट देखील नव्हते. फक्त काहीतरी साहसी करायला जायच, हि आजकाल मानसिकता झालीये. आणि राजगड तोरणा सारखे किल्ले आजकाल खूपच accesible झालेत. पण तरी सामान्य लोकांमध्ये किमान सुरक्षेच्या दृष्टीने काही जागृती व्हावी, याचाच विचार करत आमचा लास्ट डब्बा (मी, तन्मय अमेय मानसी ) तिथल्याच एका झाडाच्या सावलीत विसावला. जिथे बसलेलो ती जाग बऱ्यापैकी प्रशस्त होती, "पिनाक म्हणत होता तो बस चा रस्ता इथपर्यंत येत असावा ..... U - Turn ला पण जाग आहे इथे !! " आमच्यातल्या कोणीतरी उगाच एक पांचट जोक मारला. 
तोरण्याचा चढ
आता आदित्य आणि बाकीचे ८०% किल्ला चढून वर गेले होते. आणि आम्हाला वरून हाका मारत होते. उन देखील वाढायला लागलं होतं. पुन्हा चढाई सुरु ! ... मजल दरमजल करत एकदाच बिनीच्या दरवाज्यातून किल्ल्यात प्रवेश केला. पुढे काही पायऱ्या नंतर कोठीद्वार ओलांडले आणि किल्ल्यावर आलो. 
कोठीद्वार 
बाकी सगळे आधीच तिथल्या धर्मशाळा कम राहायच्या खोल्यांच्या पडवीवर विसावले होते. ११.३० वाजले असावेत. आता किल्ला फिरून जेवण करायचं असं सर्वानुमते ठरलं. सीताराम मामा लगेच आम्हाला घेऊन झुंझार माची च्या दिशेने निघाले. ध्वजस्तंभापाशी पोहोचलो आणि अचानक आम्हाला राजगडाचे दर्शन झाले. 


"XXXX काय जबरा दिसतोय !!!! "" .... इथपासून ...."XXXXXX ..... एवढं चालायचयं??? " .इथपर्यंत सगळ्या प्रकारच्या reactions मिळाल्या. पुढे तटबंदीवरून झुंझारमाची बघताना तर "त्या काळातल्या लोकांना त्रिवार दंडवत !" हि एकच भावना होती. नावाला साजेशी "झुंझार" माची (यालाच झुंझारमल माची देखील म्हणतात ) बघतच राहावी असं वाटत होत. फोटोग्राफीला उधाण आलं होतं. 



भेल बुरुज 





वेळेचं बंधन असल्याने माघारी परतलो. त्याच ओसरीवर जेवण आटोपलं. पुरण पोळी, पुरी भाजी, इडली फ्राय, दहीभात, असे एक से एक भारी पदार्थ जेवायला. सोबतीला ट्रेकचं official जेवण अर्थात ठेपले हे हि होतंच. तिथल्याच तळ्यात पाणी भरून घेतलं.

" निघूया का ? " अमेयचा आदेश! ... सगळे बुधला माचीच्या दिशेनी निघाले. वाटेत मेंगाईदेवीच आणि महादेवाच दर्शन घेतलं आणि कोकण दरवाजा पार करत बुधल्याच्या दिशेने निघालो. दरवाजा पार केल्या केल्या बुधला माची, विशाळा, रडतोंडी बुरुज, घोदेजीन याचं जबरदस्त दर्शन झालं. पूर्ण रस्त्यावर रेलिंग लावले आहेत. काही ठिकाणी तर रेलिंग उलट्या बाजूला (कड्याच्या दिशेला रेलिंग आणि दरी open ) लावलेत. त्याचा कसा उपयोग करावा याचे मार्गदर्शक फलक तिथे लावायला हवेत. 



उजव्या बाजूला दूरवर लिंगाणा आणि रायगड आमची सोबत करत होते. रडतोंडी बुरुजापाशी पोहोचलो. आदित्य आणि बाकीचे आधीच  बुरुजाखाली सावलीत जाऊन बसले होते. इथे खाली उतरायला लोखंडी शिडी लावलीये. त्यामुळे इथून चढणं-उतरणं सुसह्य झालं आहे. सिंहगड-रायगड केला तेव्हा आम्ही या रस्त्यानी तोरणा चढून मागच्या वाळंजाई दरवाज्यानी खाली भट्टी गावात उतरलो होतो. त्या आठवणी ताज्या झाल्या. 

आता या पुढचा रस्ता याच डोंगरसोंडेवरून होता. सगळ्यात आधी खुपसा उतार आहे. आणि नंतरची सगळी चाल बऱ्यापैकी सपाट आहे. थोडं पुढे जाऊन सावलीत पाणी प्यायला थांबलो. मागे वळून तोरण्याकडे पाहिलं. अफलातून !!! जेम्स डग्लस असं म्हणाला होता कि "सिंहगड हि जर सिंहाची गुहा असेल तर तोरणा हे गरुडाचे घरटे आहे" ... मानलं ..... १००% .... तोरणा काय भारी दिसत होता म्हणून सांगू ! महाराजांनी किल्ल्याचं नाव प्रचंडगड का ठेवलं याचा पदोपदी प्रत्यय येत होता. 


आता फक्त चालत राहायचे. गप्पा मारत मारत सगळे चालत होतो. दूरवर काही धनगर पाडे सोडले तर रस्त्यात कोणतीहि घरं नाहीत. पाण्याचा स्त्रोत तोरण्यावर शेवटचा. मी, अमेय, तन्मय, मानसी सगळ्यात शेवटी गप्पा मारत येत होतो. सावलीत थोडावेळ थांबलो. महाराजांवर खूप गप्पा झाल्या. मानसीनी मस्त झोप काढली. अर्धा तास असाच निघून गेला. बाकी सगळे बराच पुढे पोहोचले असणार. तडक निघालो. रस्त्यात एक सुंदर देवराई लागले. छान जंगल आहे. सगळे तिथे आमची वाट पाहत थांबले होते. तिथे थोडा वेळ विसावलो. 

उन उतरायला लागलं होतं. राजगड आता बराच जवळ असल्यासारखा वाटत होता. "भागोजीचा झाप जवळच आलाय, चला लवकर !" शेवटी मजल दरमजल करत आम्ही इष्टस्थळी ५-५.३० ला पोहोचलो. राजगड-तोरणा पूर्ण वाटेवर भागोजीचं घर हा एकच आधार. भागोजींनी खाली मोठ्ठं घर बांधलय, सीताराम मामांनी माहिती पुरवली. भागोजींशी बोलणी केली. त्यांच्या घरात सगळ्यांना राहायची त्यांनी सोय केली. पाणवठ्यावरून आमच्यासाठी पाणी आणून दिलं. चुलीसाठी लाकूडफाटा आणून दिला. 

तन्मयनी लगेच चुलीचा ताबा घेतला. शमांगी ताईच्या मार्गदर्शनाखाली आणि अमेयच्या मदतीनी तन्मयनी  फक्कडसा चहा (दुध, चहा, साखर, पाणी या सगळ्याच्या मापाचा घोळ घालून ) बनवला. चहापानाबरोबर चकली, कचोरी, चिक्की, लाडू असा फराळ झाला.

"मानसी म्हण कि गाणं !! " प्रत्येक ट्रेकप्रमाणे याही ट्रेकला मानसीला गाणं म्हणायचा आग्रह करण्यात आला. खूप आढेवेढे घेतल्यावर शेती एकदाची मानसी नी आमच्या गाण्याच्या मैफिलीला सुरुवात केली. शमांगी ताई, कौस्तुभ, परिन छान किशोरची गाणी गात होते. लईच धमाल!!! सूर्य कलायला लागलं होता. मावळतीच्या सूर्याच्या किरणांनी आकाशात लाल-तांबड्या रंगाची उधळण केली होती.


तन्मय, अमेय पुन्हा एकदा जेवणाच्या तयारीला लागले. बाहेर भागोजींनी शेकोटी लावली होती. आमच्यातले काही जण त्याच्या आस पास बसले होते. आपट्याच्या पानाची विडी वळून शेकोतीच्याच लाकडांनी ती पेटवली आणि त्याचा एक जबर झुरका मारत भागोजींनी बोलायला सुरुवात केली " ह्ये जग कुनी बनविलं ?? ह्ये आकाशातले तारे कोन पेटवतो? ह्ये मुरुबाचा डोंगर कुनी बनविला ?? एव्ढे शिकलात .... कधी इचार केलाय का तुमी शेहरातल्या लोकांनी ?? " आणि त्यानंतर अर्धा एक तास ते याच विषयावर बोलत होते. माझ्या अल्पमतीला काही ते कळल नाही जास्त. पण त्या शांततेत, मोकळ्या आभाळाखाली, हे असं काही गूढ अगम्य ऐकायला छान वाटत होतं.



एवढ्यात जेवण तयार झाल्याच सांगण्यात आलं. मस्त वाफाळती खिचडी, त्यावर भरपूर तूप, पुरणपोळी, .... मजा आली. जेवण आटोपून सगळी आवरा-आवरी केली आणि झोपायच्या तयारीला लागलो. उद्याच्या दिवसाचा विचार करत स्लीपिंग bag अंथरली. बाहेर शेकोटीतल्या लाकडांचा जळतानाचा फट-फट , आणि रातकिड्यांचा किरर्र किरर्र हे आवाज सोडले तर बाकी सगळीकडे सामसूम होती...... राजगड दूरवर खुणावत होता ... पण मनानी मी कधीच गडावर पोहोचलो होतो.
(क्रमशः)

Monday, 12 September 2016

"जवाहर"

"अय मंग्या, अजून एक प्लान आहे. "
"बोल"
"सकाळी तिथून लवकर निघून अशेरी करायचा का ? "
"मला काहीही चालेल "
" बर"
....
....
....
..
...
..
"काय करायच रे " इति मी
"सेगवा पण करू शकतो, अहमदाबाद हायवेलाच आहे" - आदित्य
"हां"

....
....
....
...
"शेवटी काय ठरलाय प्लान आपला " - आदित्य
"एक मस्त प्लान आहे ...."
"काय ? "
"सगळ्यात आधी ठरलेलाच ... :P"

काही अश्या पद्धतीत आमचं (मी आणि आदित्य ) भुपतगड ट्रेकचं प्लानिंग चालू होतं. सगळ्यात आधी ठरलेलं कि भूपतगड आणि धाबोसा धबधबा बघायचा (ओंकार ओक बाबांची आमच्यावर खूप माया ... त्यांनीच हा प्लान दिलेला आशीर्वाद म्हणून ... ) .... . पण या पावसामधे एवढ्याश्या गोष्टींवर आमचं समाधान होईना. मग आदित्य म्हणे कि अशेरी पण करू भुपत बरोबर! आयला .... केवढे कष्ट ! मग कुठूनसा सेगवा नावाचा किल्ला अहमदाबाद हायवेवर आहे असं कळल. पण त्याची पण काही जास्त माहिती मिळेना. शेवटी ठरलेलाच ट्रेक करायचा असं ठरलं. त्रिंगलवाडी, सागरगड आणि कर्नाळा सारख्या चिंब करणाऱ्या ट्रेकनंतर भुपतगड? बस ??? .... मंग्या काय झालय तुला !! पण माझा हा विचार किती चुकीचा आहे हे मलाच कळून चुकलं.

पावसाला आला कि ट्रेकिंगला उधाण येतं. वरूणराजा आपल्या श्रावणसरी बरसवत, धरणीवर हिरवीगर्द गालीच्यांच्या पायघड्याच घालतो. मग सगळे निसर्गसखे हे लोभसवाण रूप पाहायला घराबाहेर पडतात.  त्यातले काही पूर्वीपासून निसर्गात रमणारे असतात, तर काहींची आत्ताच कुठे निसर्गाशी गट्टी झालेली असते. पण पावसाच्या या ४ महिन्यात सगळ्यांचा उद्देश ठरलेला ...... मनसोक्त चिंब भिजायचं , धुक्यात हरवायचं, सह्याद्रीचं हे रूपड नजरेत साठवायचं. त्यात एखादा धबधबा असला तर मग सोनेपे सुहागाच!!!

वाडा - विक्रमगडच्या पुढे पालघर जिल्ह्यात (पूर्वीचा ठाणे जिल्हा ) "जव्हार" चा परिसर तसा दुर्लक्षित .... पण अतिशय मनमोहक. माथेरान, महाबळेश्वरला  टक्कर देईल असा हा परिसर. पावसाळ्यात तर भान हरपून टाकणारा. याच जव्हारच्या १७-१८ किमी पुढे भुपतगड नावाचा एक छोटेखानी पण सुबक किल्ला आपलं वेगळेपण टिकवून उभा आहे. या पावसाळ्यात तिथे जायचा बेत आखला गेला. सोबतीला आदित्य, प्रणव, मानसी, निखील, अमेय (छोटा लांबा) या  चक्रमांचं टोळकं होतंच. तन्वी, अमृता, अनुप, सुयोग, गौरव, हरी, दिपाली, शेट्टी, वैभव, गौरी हे मित्र-मैत्रिणी पण येणार असं कळल. धमाल येणार तर !

शनिवारी ठरल्याप्रमाणे रात्री ११.३० ला मुलुंडहून जव्हारच्या दिशेने निघालो. खारीगाव टोलनाका- भिवंडी हा प्रवास (रस्त्यातल्या खड्ड्यांच्या आणि बस Driver च्या कृपेने ) बस मधला कमी आणि होडीमधला जास्त वाटत होता. वाड्याला पोहोचेपर्यंत जवळपास सगळेच झोपी गेले होते. मी, आदि , निखील, मानसी, आमच्या शेवटच्या सीट पर्यंत ऐकू जाईल अश्या हळू आवाजात गप्पा मारत होतो. वाडा-विक्रमगड-जव्हार हा रस्ता अतिशय सुंदर! इथे बाईकवर आलो तर किती धमाल येईल यावर एक परिसंवाद !  जबरदस्त वळणं मोठ्या "शिताफिनी" घेत आमचा "मायकल शुमाकर" लोकांची झोप उडवायचं काम करत होता. आता बऱ्याच लोकांना चहाची तलफ आली होती. जव्हार आलंच होतं .. आम्ही तिथल्याच शिवनेरी धाब्यावर थांबलो. मस्स्त धुक्यात हरवलेली वाट का कोण जाणे "हि वाट दूर जाते... " ची आठवण करून गेली. "स्वप्नामधील गावा"च विचार करत तिथे चहाची वाट पाहत बसलो. अर्थहीन कथानक असलेला कोणतातरी साउथचा सिनेमा तिथल्या TV वर लावला होतं (एक माणूस सापाची पुंगी वाजवतो आणि अचानक एक बाई सापाचं रूप घेते . या level चं कथानक ... या पुढे बघायची माझी हिम्मत झाली नाही) .... त्या सापानी बाकी छान अभिनय केला . :P



साखर पाक कम चहा संपवून परत पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. भुपतगडच्या पायथ्याचं गाव चिंचवाडी. जव्हार गावाच्या सुरुवातीलाच मुख्य रस्त्यालागतच कुलदीप म्हणून हॉटेल आहे. तिथून उजवीकडे (कुलदीप हॉटेल मुख्य रस्त्याच्या डावीकडे आणि त्याच्या समोर ) एक रस्ता जातो.
कुलदीप हॉटेल च्या पुढचा रस्ता

हा जव्हार झाप रस्ता. हा रस्ता पकडायचा. offline नकाशे मोबाईलमधे असतील तर उत्तम. त्यावर झाप हे गाव शोधावे. चिंचवाडी गाव झापच्या पुढे एखाद-दोन किलोमीटर. Driver बाकी खमक्या हवा. पूर्णवेळ रस्त्याच्या कडेला छान वनराई. पुढे चावकी नावच गाव जिथून डावीकडे वळायचं आणि सरळ सुटायचं .... रस्त्यात फोन्डीचा पाडा, पवार पाडा, श्रीरामपूर अशी गावं ओलांडून शेवटी झापला पोहोचलो. गावातच थोडी झोप काढावी असा विचार होता. पण पावसामुळे गावातल्या सगळ्या पडव्या भिजलेल्या होत्या. म्हणून चिंचवाडीच गाठली. इथेही झोपायला काही खास जागा नाही मिळाली. बस तिथेच लाऊन बस मधेच थोडी झोप काढायच ठरलं. पहाटेचे ४.३० झाले होते. अख्ख गाव अजूनही साखरझोपेतच होतं. आमच्यातलेहि काही जण पुन्हा झोपेची करुणा भाकायला लागले. आणि आम्ही निशाचर प्राणी तिथेच थोडा फेरफटका मारायला निघालो.

कोंबडा आरवला. गाव जाग होयला लागलं. फटफटायला लागलं होतं. सगळा परिसर आता उजेडात दिसू लागला. काय टुमदार गाव !

चिंचवाडी गाव 

वरुणराजाने गावावर धुक्याची जणू दुलईच अंथरली होती. मग सगळ्यांचे कॅमेरे सरसावले.

गावातच थोडा नाश्ता करून भुपतगडावर जायचं ठरलं. ब्रेड-जाम-बटर चा नाश्ता झाला. आता प्रश्न आला चहाचा. तिथेच एका घरात विचारलं " भाऊ चहा मिळेल का? " .... "मिळतंय तर .. पन त्यो दुध वाला न्हाई मिळायचा"... चालेल कि ... तसही या निसर्गाच्या सानिध्यामुळे श्रीमंत झालोच आहोत ..तर black tea घेऊ.
मग त्या मामांनी केलेला फक्कडसा कोरा चहा.

"भुपतगड कुठं ? " मामांना विचारलं.
"भोपट किल्ला ना ,,,, हा काय ... ह्ये असं सरळ सरळ जा या रस्त्यानी .... कुठबी वळायचं न्हाई ... आलंच कि मग " मामांनी सांगितलं,
"तसं काही कठीण नाही ना " ... आम्ही चौकशी केली.
" नाही नाही .... आधी तर अर्ध्यापर्यंत गाडीबी गेली असती पन आता पावसानी समदा चिखल केलाय. " .

साधारण ७.४५ वाजता आम्ही गडाच्या दिशेनी चालायला सुरुवात केली. चांगली मळलेली वाट, काही ठिकाणी चिखलानी भरलेली. चढ पण खूप जास्त नाही. गप्पा मारत मारत आम्ही साधारण रस्ता तुडवत होतो. किल्ला नक्की कोणता हे काही केल्या दिसत नव्हतं.

सुरुवातीचा रस्ता 



साधारण अर्ध्या तासात एका प्रशस्त माळरानावर पोहोचलो. ज्या डोंगराला वळसा घालत आलो त्याला मागे ठेऊन समोर बघितला कि दिसतो आपला भुपत. दिसला बाबा एकदाचा किल्ला. .... इथेच दगडावर पावलांचे आकार कोरलेले आढळतात. यालाच का कुणास ठाऊक "सीतेची पावलं" म्हणतात.
सीतेची पावले

तिथेच ओळख परेड करून घेतली,

ओळख परेड  (सौजन्य: मानसी देशमुख)


पुढची वाटचाल सुरु झाली. बऱ्यापैकी सोप्पा रस्ता पण काही ठिकाणी चिखलामुळे बराच निसरडा झाला होता. पुन्हा अर्ध्या तासात गडाच प्रवेशद्वार लागलं.
गडाचा प्रवेश 

दार अस्तित्वात नसल तरी बुरुज आणि बाजूची तटबंदी बऱ्यापैकी अवस्थेत तग धरून आहे. गडावर बघण्यासारख फार काही नाही. परंतु आस पास च्या परिसराचं सुरेख दर्शन होतं.

धुक्याचं साम्राज्य 


गडाला उत्तरेकडे व दक्षिणेकडे असे एकूण दोन दरवाजे होते. आज हे दोन्ही दरवाजे नष्ट झालेले आढळतात. गडावर म्हसोबा, हनुमान या सारख्या देवता लक्ष ठेऊन आहेत.

दरवाज्यातून आत थोडं पुढे चालत गेलं कि पडक्या वाड्याचे अवशेष लागतात. त्याच्याच मागे पाण्याचा एक मोठा हौद आहे. हौदाच्या थोडसं वरच्या अंगाला पाण्याची ४-५ टाकी खोदलेली आहेत. 

पाण्याची टाकी 

आणि सोबतीला रिमझिम पावसाच्या सरी, गर्द हिरवळ आणि वेडावणार धुकं !! .... फोटो तो बनता है ना बॉस .... सगळे पाचोळ्यासारखे सैरावैरा सुटले होते. दर २ मिनिटाच्या अंतरावर एक फोटो या गतीने भुपतगडाच फोटोशूट चालू होतं. लोकांना एकत्र करून मी पण एक फोटो क्लिकला.



प्राचिनकाळी डहाणू , (नाला) सोपारा बंदरांमध्ये उतरलेला माल जव्हार मार्गे गोंडा गाट, थळ घाटाने त्र्यंबकेश्वर डोंगररांग ओलांडून नाशिकच्या बाजारपेठेत जात असे. या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी समुद्र किनार्‍यावर डहाणूचा किल्ला, घाटाखाली भूपतगड व त्र्यंबकेश्वर डोंगररांगेत बसगड (भास्करगड), हरिहर, त्र्यंबक, त्रिंगलवाडी हे गड बांधण्यात आले.(हि माहिती ट्रेक क्षितीजच्या संकेतस्थळावरून साभार घेतली आहे)













बऱ्यापैकी फोटोग्राफी झाली होती. १० वाजता गड उतरायला सुरुवात केली. 
रमत गमत गप्पा मारत मारत चिंचवाडी गावात यायला ११ वाजले. 
तडक निघालो जव्हारच्या दिशेनी.... धाबोसा चा धबधबा आम्हाला खुणावत होता. जव्हारला पोहोचेपर्यंत सगळ्यांना भूक लागली होती. जव्हारच्या विजयस्तंभाजवळ (clock tower) एका हॉटेल वजा टपरीवर २-४ वडापाव हाणले. तिथूनच जवळ शिरपामाळ म्हणून एक जागा आहे. ती पाहून पुढे जाण्याचा निर्णय झाला. 

शिरपामाळ प्रवेश 

शिरपामाळ स्मारक 

शिवराय सुरतेच्या स्वारीवर जाताना १६६४ साली मराठा सैन्यानी या माळावर मुक्काम ठोकला होता. महाराजांची आणि जव्हारचे राजे विक्रमशहा यांची या ठिकाणी भेट झाली होती असं इतिहास सांगतो. त्या घटनेचं स्मारक इथे बांधलं आहे. महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या त्या जागेचं दर्शन घेतलं आणि पुढचा प्रवास सुरु केला. 

जव्हार-सिल्वासा रस्त्याला लागायचं. अरुंद रस्ता तसं बऱ्यापैकी स्थितीत आहे. साधारण १७-१८ किमी वर धाबोसा चा धबधबा लागतो. बऱ्यापैकी व्यावसायिकता आलीये या जागेला. बऱ्यापैकी गजबजलेली जागा झाली आहे. बरीच हॉटेल्स, दुकाने, resorts वगैरे गाडी लावायला सोय केली आहे. 

धाबोसा धबधबा 


धबधब्याच्या खाली जायला मस्तपैकी पायऱ्यांची वाट केलेली आहे. मधे काही ठिकाणी त्या पायऱ्या तुटलेल्या आहेत. पण आरामात उतरता येईल अशी सोय आहे. धबधबा बऱ्यापैकी मोठा असल्याने त्याच्या अगदी खाली जाणे धोक्याचं ठरू शकत. पण त्या धबधब्याचे तुषार दूरवरदेखील अनुभवता येतात. 
तिथल्याच पाण्यात डुंबून अजून एक पावसाळी ट्रेकच पुण्य पदरात पाडून घेतलं. मनसोक्त भिजून झाल्यावर परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. तिथेच बाहेर नदीकाठी पेटपूजा आटोपली.

जुगाड : हा प्रकार वाहत्या पाण्यात मासे पकडण्यासाठी लावलेला आढळला. 


या ट्रेकनी मला एक गोष्ट पुन्हा एकदा दाखवून दिली. जागा हि कधीच चांगली किंवा वाईट नसते .... आपण ज्यांच्याबरोबर तिथे जातो ते त्या जागेला सुंदर बनवतात. आधी आम्हाला वाटत होतं "कायचा भुपतगड ... एक ढेंग टाकली कि आला !!! तिथं कसला ट्रेक !!! " ..... पण गडावरच्या त्या रम्य धुक्याचा तो अनुभव म्हणजे स्वर्गसुख .... तिथेच राहावं असा ... आणि शेवटी धाबोसा म्हणजे तर त्या स्वर्गीय आनंदाचा कळसच !! खरच हा सगळा परिसर म्हणजे खऱ्या अर्थानी महाराष्ट्राचं "जवाहर" आहे. शहरी गजबजाटापासून दूर ... शांत, रम्य, प्रसन्न 

आणखीन एक पावसाळी ट्रेक सुफळ संपूर्ण ! भेटूच पुढच्या ट्रेक ला !!


Monday, 13 June 2016

कळसुबाई – एक अत्युच्च अनुभव

“महाराष्ट्रातल सगळ्यात उंच शिखर कोणत?”, शाळेतले सर आम्हाला विचारायचे आणि आम्ही सगळी पोरं एकसुरात “क ळ सु बा ई” असं ओरडायचो. पुढे डोगर भटकायचा छंद लागल्यावर तर कळसुबाई बद्दल एक विलक्षण आकर्षण निर्माण झालं. रतनगड, कात्राबाई, अलंग मदन कुलंग, भंडारदरा ..... प्रत्येक वेळी कळसुबाईचं शिखर साथ करायचं, पण तिथे जायचा योग अजून आला नव्हता. दर वेळी काही ना काही कारणांनी तिथे जायचे आमचे मनसुबे उधळले जात होते. कळसूआई च्या मनात होतं तरी काय??
सह्यांकन २०१५ नुकतंच संपलं होतं आणि चक्रम हायकर्सचं पुढील वेळापत्रक काढायची लगबग सुरु झाली. अनायसे मला वेळ होता. बऱ्याच वर्षांपासून हुलकावणी देणारा कळसुबाई trek केला तर? उत्तम !!! परम मित्र ओंकार यानी हा ट्रेक रात्री करायची कल्पना मांडली. अतिउत्तम !!! त्यानीच तिथले गावकर्यांचे फोन नंबर वगैरे मदत केली. .... ठरलं तर !! कळसुबाई करायचा – आणि रात्री आणि शिखरावरून सूर्योदय पहायचा. लगेच पौर्णिमेच्या आसपासचे रविवार शोधले गेले आणि २० फेब्रुवारी हि रात्र निवडली. चथुर्दशी होती कदाचित. चंद्रप्रकाश भरपूर असणार. कसा असेल कळसुबाई चा शिखरमाथा? वारा कसा असेल? वरून दृश्य कसा दिसत असेल? अश्या प्रश्नांचा विचार करत करत दिवस ढकलत होतो. शेवटी तो दिवस (रात्र) उजाडला.

आम्ही सगळे मुलुंडला रात्री १०.०० ला भेटलो. गायत्री, प्रणव सारखे बरेच जुने मित्र भेटले. सामानाची जमवा-जमव करून निघायला १०.३० वाजले. ठाणा ओलांडून गाडी नाशिक हायवेला लागली तोपर्यंत सगळे झोपेच्या आधीन झालेले. एका अर्थी चांगलच होतं ते. रात्री जगायच होतं ना शिखर चढायला. बारी गावातल्या संतोष खाडेशी बोलणं झाल होतं. त्याला घोटीला पोचल्यावर फोने करायचा होता. तो आम्हाला गावात पोचल्यावर चहाची सोय करणार होता आणि एक वाटाड्या देखील सोबतीला देणार होता. ठरल्याप्रमाणे त्याला आम्ही घोटी ला पोचल्याचं कळवलं आणि गाडीनी भंडारदरा रस्ता धरला. दूरवर एक उंच शिखर आणि त्यावर चमकणारे दिवे दिसायला लागले आणि गाडी रस्ता चुकत-चुकत मध्यरात्री २.०० वाजता बारी गावात पोचली.

छानसं टुमदार गाव! कळसुबाई गावकऱ्यांच आराध्य दैवत! प्रत्येक ठिकाणी “कळसुबाई प्रसन्न” लिहिलेल आढळल. कळसुबाईनीच तर त्यांच्या रोजगाराची सोय केली आहे. कळसुबाई शिखर चढायला येणाऱ्यांसाठी गावकरी जेवण, चहा, नाष्टा, ... एवढाच काय टेंट देखील पुरवतात. आता याला बाजारीकरण म्हणायच कि नाही हा वादाचा मुद्दा पण गावकऱ्यांना रोजगार मिळालाय एवढ नक्की.

सौ. संतोष खाडेंनी आम्हाला चहा बनवून दिला. तिथल्याच हनुमान मंदिरात चहा घेत घेतच सहभागींना नियम वगैरे सांगितले. हे सगळं होऊन २.४५ वाजता आम्ही चढाईला सुरुवात केली. 
फारशी अंगावर येणारी चढण नसल्याने जास्त दमणूक होत नव्हती. १५-२० मिनिटाच्या अंतरावर एक देऊळ लागलं. आमच्या torch च्या उजेडात ते नक्की कोणत्या देवाचं देऊळ आहे ते काही कळल नाही. बहुदा तांदळा असावा असा विचार करून त्या देवबाप्पाला नमस्कार करून आम्ही पुढचं मार्गक्रमण सुरु केलं. चंद्रप्रकाश एवढा लक्ख होता कि आम्हाला torch अजिबात लावली लागलीच नाही. मधे-मधे थांबत विसावा घेत घेत आमचा शेवटचा डबा रस्ता तुडवत होता. एका ठिकाणी विसावा घेत असताना आमच्यातल्याच शर्वरीनी “श्रीखंडाच्या वड्या” खायला काढल्या. बऱ्याच वर्षांनी त्या वड्या पाहून एकदम लहानपणाची आठवण आली ... आम्ही सगळे खुश !!! .... मग काय .... हाणल्या चांगल्या ७-८ वड्या !!

थोड्याच वेळात आम्हाला पहिली शिडी लागली. शिडी कसली ... लोखंडाचा शिडीच्या आकाराचा ढाचा टेकवून फिट्ट केलाय. प्रत्येक पावलागणिक ती शिडी मस्त हलत होती. शेवटी एकदाची ती शिडी पार झाली. अशीच थोड्या वेळानी दुसरी शिडी लागली. त्या मानानी थोडीशी मोठी वाटणारी. ती पार करून वर आलो तर वरती एक गावातले मामा लिंबू सरबत घेऊन तयार. बरेचसे सहभागी आधीच पुढे गेलेले होते, आम्ही काही मोजकेच लोक मागे राहिलो होतो. मस्तपैकी सरबत पिऊन तरतरीत झालो. मामांना विचारलं, “अजून किती राहिल ?” ... “ हे काय आलं कि हिथ. अस्सा एवढा टेमका चढून गेलात नव्ह का कि आलच” ... आता गावकऱ्यांच “आलं कि हिथ” आणि आपल्याला लागणारा वेळ यात बराच फरक असतो हे मी जाणून होतो. ते गाववाले मामा सरबत संपलं म्हणून परत बारीत जायला निघाले आणि आम्ही देखील त्यांना “राम राम “ करून पुढचा रस्ता धरला.

रात्री गाडीतून दिसणारे ते दिवे आता जवळ असल्यासारखे दिसत होते. चांदोबा दिसेनासा झाला होता. सूर्योदय होण्याची चिन्ह दिसायला लागली होती. “चला चला ! लवकर ! सूर्य उगवायच्या आत माथा गाठायचं” असं म्हणत एकमेकांना प्रोत्साहन देत आम्ही ती शेवटची चढण चढायला लागलो. या चढणीच्या आधीच्या पठारावर १/२ झापांमध्ये काही पर्यटक रात्रीच येऊन राहिले होते तर काहींनी त्यांचे तंबू बाहेर गाडले होते. त्या सर्वांना मागे टाकत आम्ही शेवटचा चढ चढू लागलो. शेवटी कळसुबाईचं ते छोटेखानी सुबक देऊळ दिसायला लागलं आणि आकाशाचे रंग देखील हळू हळू बदलायला सुरुवात झाली. 

शिखर माथ्यावरील कळसुबाई मंदिर (सौजन्य : मानसी देशमुख )
६ वाजता त्या देवळाशी पोचलो आणि कॅमेरा काढून तयार झालो. हळू हळू तो तेजाचा स्वामी आम्हाला दर्शन देण्यासाठी क्षितिजावर अवतरायला सुरुवात झाली. किती सुरेख अनुभव! रंगांची उधळण करत सुर्व्यादेव हळू हळू पूर्ण दिसायला लागला. त्याची किरणं फाकली जाऊ लागली आणि अक्ख्या आकाशात त्या तांबूस लाल रंगाचा सडा पडला.
(सौजन्य : मानसी देशमुख )


थोडा वेळ तिथेच माथ्यावर घालवला. कळसुबाई ला खेटून अलंग – मदन चे कातळकडे त्यांच्या राकटतेची साक्ष देत होते. रतनचा खुट्टा ढगात घुसून गगनाला गवसणी घालत होता. लांबवर अवंध-पट्ट्याच्या पवनचक्क्या दिसत होत्या. चौफेर दिसणारं हे सह्याद्रीच न्यारं रुपडं नजरेत साठवत उतरायला सुरुवात केली.




शेवटची शिडी (सौजन्य : प्रज्ञा )
साहेबराव आधीच खालच्या पठारावर पोचले होते (वास्तविक साहेबराव हा माझ्यापेक्षा लहान मुलगा होता, पण “साहेबराव” या नावालाच अरे-तुरे केलेलं बर दिसत नाही, म्हणून हे आदरार्थी बहुवचन). 

त्यांनी आधीच आमच्या साठी चहा आणि पोहे यांचा छान बंदोबस्त केला होता. कडकडून भूक लागली होती. पोह्यांवर तुटून पडलो. त्या पठ्यानी पण काय चविष्ट पोहे केलेले ! मग त्या चहा पोह्यांचा आस्वाद घेत घेत आम्ही ओळख परेड करून घेतली. याच पठारावर एक विहीर आहे. कळसुबाईच्या पूर्ण रस्त्यावर बारी नंतर हि एकच पाण्याची सोय. बाकी रस्त्यात पाणी नाही.








चहा - गप्पा भन्नाट combination (सौजन्य : मानसी देशमुख )

९.३० ला आम्ही शिखर उतरायला सुरुवात केली. जस जसं उन वाढायला लागलं तसतसं आम्ही रात्री ट्रेक केल्याबद्दल सुटकेचा निश्वास सोडला आणि मजल दरमजल करीन ११.३० ला बारी गावात पोचलो. खाडेंकडेच जेवण केलं. छान डाळ- भात, भाकरी, कोबीची भाजी, लोणचं वगैरे. कोबीच्या भाजीचा लालभडक रंग त्याच्या चवीची वर्दी देत होता. त्यांच्याच घरात मस्त पंगत बसली. जेवणानंतर ताक! 

१.३० ला परतीच्या प्रवासाला सुरुवात केली ती सुंदर आठवणी घेऊनच. अनेक आठवणी ! रात्री शिखर चढताना सर्वात मागे राहून प्रणव, गौरव बरोबर केलेली ती भंकस, तो शिडी हलताना उडालेला जीवाचा थरकाप, माथ्यावर MSR लावून maggi करायचे निष्फळ प्रयत्न, माथ्यावर शेट्टीचं, शाल अगदी डोक्यावरून घेऊन झोपणं, भरत, अंबरीश, कौस्तुभया कॉलेजच्या मित्रांबरोबर काढलेले selfie आणि सर्वात महत्वाच म्हणजे माथ्यावरून दिसणारा आमचा प्रिय सह्याद्री! त्याला वचन दिलंय ... लवकरच परत येईन .... येणार का मग तुम्ही ? सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळायला ?